जामफळ धरण पीडीएन जोडणीचा शुभारंभ; ५४ गावांच्या शिवारात सिंचनाची नवी आशा.

शिंदखेडा : पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शिंदखेडा तालुक्यासाठी जामफळ धरणाचा प्रकल्प परिवर्तनाची नवी दिशा ठरणार आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या (पीडीएन) मुख्य पाइपलाइन जोडणी कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.
₹१,०५८ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील तब्बल ५४ गावांतील २६ हजार ९०७ हेक्टर क्षेत्राला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात आता तापी नदीचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
योजनेअंतर्गत जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी येत्या तीन ते चार महिन्यांत सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्रात पाणी वितरणाची व्यवस्था विकसित करण्यासाठी कामाला गती देण्यात येणार आहे. पूर्ण प्रकल्पाची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांना लवकर पाणी उपलब्ध व्हावे, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे.

शिंदखेडा तालुक्याच्या एका बाजूला बारमाही वाहणारी तापी नदी असतानाही अनेक गावांना आजवर दुष्काळाचा सामना करावा लागला. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बंदिस्त पाइपलाइन प्रणाली उभारली जात आहे. त्यामुळे पाण्याची गळती व अपव्यय कमी होऊन उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्राला लाभ मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पीक नियोजन करणे शक्य होईल. अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची संधी वाढेल, शेतीला स्थैर्य मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल. धरणातील पाणी गावापर्यंतच नव्हे, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सुलवाडे-जामफळ प्रकल्पाबरोबरच तापी-बुराई योजना, बंधारे आणि विविध जलसंधारण कामांनाही गती देण्यात येत आहे. येत्या दोन ते अडीच वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार एकर क्षेत्राला शाश्वत सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, संबंधित अधिकारी आणि शेतकरी बांधवांचे आभार मानण्यात आले.
दुष्काळाची ओळख पुसून शिंदखेड्याच्या शिवारात समृद्धीची नवी पहाट उगवण्याची आशा जामफळ धरण प्रकल्पाने निर्माण केली आहे.












