चिमठाणे -प्रतिनिधी – प्रविण भोई
चिमठाणे येथे फ्रिजचा भीषण स्फोट; घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक!
लाखोंचे नुकसान; आगीत सर्व काही भस्मसात, मात्र घरातील देव्हारा शाबूत!.. ……..
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान फ्रिजचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली घरी कोणीही नसल्याने अनर्थ टळला घरातील महिला व मुले गावी व घरमालक बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे . या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाची बाब म्हणजे या भीषण आगीत घरातील देव्हारा मात्र सुखरूप राहिला.
चिमठाणे येथील रहिवासी विजय नामदेव मराठे यांच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील किचन रूममध्ये हा प्रकार घडला. सकाळच्या सुमारास किचनमध्ये असलेल्या फ्रिजचा अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी किचनमधील साहित्याला वेढा घातल्याने घरातील संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या घरचे सिलिंग प्लास्टर सुद्धा खाली येऊन पडले गॅस सिलेंडर अगीतून वाचले l.
या आगीत फ्रिज, पाण्याचे जार, कपाटावर व परदी वर ठेवलेल्या बॅगा, साड्या, कपडे, दागिने, स्टीलची भांडी,गॅस शेगडी तांब्याच्या घागरी, पत्र्याच्या कोठ्या, डबे तसेच घरातील रोकड जळून खाक झाली. याशिवाय किचनच्या भिंतीलगत असलेला टीव्ही आणि कुलरदेखील आगीच्या तडाख्यात सापडून नुकसानग्रस्त झाले.
क्षणार्धात डोळ्यांसमोर आयुष्यभर कष्टाने जमवलेला संसार जळून खाक झाल्याने मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आगीत सर्व काही जळाले, मात्र देव्हारा राहिला सुखरूप!
या भीषण आगीत घरातील जवळपास सर्वच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे घरातील देव्हारा आणि त्यातील देवमूर्ती सुखरूप राहिल्याचे दिसून आले. या घटनेची परिसरात विशेष चर्चा होत असून संकटाच्या काळातही देव्हारा सुरक्षित राहिल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, फ्रिजच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा संबंधित यंत्रणांच्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. मराठे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.












